मा. खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते वाकडी (नवीन), ता. चामोर्शी येथे जय शिवराय क्रीडा मंडळाच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
दि. २० डिसेंबर २०२४
पत्रकार आनंद मेश्राम
चामोर्शी :- जय शिवराय क्रीडा मंडळ, वाकडी (नवीन) ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांच्या वतीने मामा तलाव परिसरात भव्य वजन गट दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मा. खा. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर मा. खा. अशोकजी नेते यांनी उद्घाटन फित कापून स्पर्धेचे उद्घाटन केले.
या उद्घाटन प्रसंगी मा. खा.तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत ते म्हणाले की, “कबड्डी हा सांघिक खेळ असून, तो युवकांमध्ये एकजूट आणि शारीरिक सुदृढता वाढवतो. तरुणांनी अशा मैदानी खेळांमध्ये उस्फूर्त सहभाग घ्यावा. खेळासोबत शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि शिक्षणाकडेही लक्ष द्या. कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे युवकांना क्रीडाविषयीची आवड निर्माण होते आणि करिअर घडवण्याची प्रेरणा मिळते.”
तसेच, त्यांनी गावातील समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक विचार मांडत, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, अमोल मंगर, कुडवे सर, दुधे सर, सोरते सर, प्रकाश मेश्राम, मंडळाचे अध्यक्ष वैभव सोमनकर, सुरेश बारसागडे, विमलाबाई मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.