राज्याचे सर्वंकष वाळूधोरण लवकरच
•महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार
*मुंबई, ता. ३ :* गौणखनिज आणि वाळूतस्करीसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली असून, साधारण १५ दिवसांत राज्याचे वाळूधोरण तयार करण्यात येणार असल्याचा निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
पत्रकारांना त्यांनी सांगितले की, मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असून, ही दरी कमी झाल्यानंतर वाळू आणि गौण खनिजांच्या तस्करीला आळा बसणार आहे. हे धोरण तयार करताना तज्ज्ञांच्या सूचना घेण्यात येणार असून, इतर राज्यांनी तयार केलेल्या वाळूधोरणांचाही सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
*अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल*
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, गौण खनिजांबाबतचे सर्व अधिकार आतापर्यंत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. आता ते जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
यामुळे सर्व प्रकारच्या गौण खनिजांचे नियमन अधिक पारदर्शक होईल. विशेषतः वाळू उत्खननासंदर्भात असलेली अनियमितता कमी होण्यास मदत होईल. तसेच जिल्हा स्तरावरील निर्णयप्रक्रियेत याबाबत अधिक सुसूत्रता येऊन वाळू माफियांवर कठोर कारवाई करता येईल.
• *विकसित महाराष्ट्राच्या संकल्पला साथ*
सामना दैनिकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा उल्लेख केला असल्याबद्दल सामना दैनिकाचे अभिनंदन करत उशिरा का होईना विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलेल्या देवेंद्रजींचे अभिनंदन केले, यापूर्वीही त्यांना करता आले असते, असे बावनकुळे म्हणाले.
• *१०० दिवसांत अजून चांगलं चित्र*
केवळ सहा महिन्यांतच थेट परकीय गुंतवणुकीचा राज्यात उच्चांक झाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, की ही तर फक्त सुरुवात आहे. येत्या १०० दिवसांत आपल्याला अजून चांगलं चित्र पाहायला मिळेल. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ईव्हीएमसंदर्भात उत्तम जानकर यांना काही प्रश्न असल्यास त्यांनी सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
• *तो राष्ट्रवादीचा निर्णय असेल*
बीड जिल्ह्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, तपासयंत्रणांच्या कामावर, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होईल अशा पद्धतीची वक्तव्ये कोणीही करू नयेत, असे ते म्हणाले. बीडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून, कोणाला पालकमंत्री करायचे याचा निर्णय त्या पक्षाने घ्यायचा आहे.
—–
*चौकट*
*प्रवास आणि संवादातून जनतेची नाडी समजते*
२०२४ ते १९ या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे. राज्यातील प्रत्येक भागातील गोष्टींचं त्यांना बारकाईनं आकलन आहे. प्रवास आणि संवाद केल्याने नेत्याला जनतेची नाडी समजते आणि त्यातूनच प्रशासनावर पकड तयार होते. मोदींजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणारा महाराष्ट्र तयार करणे हे सध्या देवेंद्रजींचे मुख्य उद्दिष्ट आहे, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
—-
मा.संपादक , स. न.
बातमी आपल्या दैनिकांत प्रसिद्ध करावी ही विनंती.
आपला,
रघुनाथ पांडे
