सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत सुलभतेने पोहचाव्यात यावर भर*
– महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पत्रकार आनंद मेश्राम
कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या तिर्थदर्शन यात्रेस प्रारंभ
नागपूर,दि.01 : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सर्वसामान्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ व्हावा यादृष्टीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा ही अनेक गोरगरिबांना आपल्या इच्छांची पूर्ती करणारी यात्रा म्हणून महत्वाची आहे. यादृष्टीने विचार करुन कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेच्यावतीने महालक्ष्मी ते अयोध्या तिर्थयात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच यात्रेत आमच्या कष्टकरी लाडक्या बहिणींना अयोध्या येथील तिर्थदर्शनाचा लाभ होत असल्याचा मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कोराडी महालक्ष्मी संस्थांच्यावतीने आयोजित या तिर्थयात्रेचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. वातानुकुलीत बसद्वारे सुमारे 54 महिला यात्रेकरुंना यात संधी मिळाली.
महिण्यातून दोन वेळा ही यात्रा अयोध्याला जाईल. आजच्या यात्रेकरुमध्ये अनेक बहिणी या दररोज रोजीवर कामाला जाणाऱ्या आहेत. तिर्थयात्रा करण्याचे स्वप्न त्यांनी मोठ्या आशेने बाळगले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे आजवर पूर्ण न होणारी त्यांचे हे स्वप्न या तिर्थयात्रेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे हे अधिक महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कालांतराने ही योजना मुख्यमंत्री तिर्थदर्शन यात्रेच्या स्वरुपात अधिक परिपूर्ण करु असे त्यांनी स्पष्ट केले.
माझे स्वप्न पूर्ण झाले
– देवांगना कटरे
मला मुली आहेत. मुलींचे लग्न झाले. पती नाही. मी एकटीच आहे. शेतात व इतर ठिकाणी रोजीने कामाला जाऊन माझा उदरनिर्वाह मी भागविते. माझ्या मनातही तिर्थक्षेत्र यात्रेची अनेक वर्षांपासून इच्छा होती. आज ती इच्छा या तिर्थक्षेत्र यात्रेच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे भावूग उद्गार देवांगना कटरे यांनी काढले. माझ्या समवेत असलेल्या इतर महिलांनाही याचा मनस्वी आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या यात्रेत सहभागी यात्रेकरुंपैकी बहुतेकजण वयाच्या साठीपेक्षा अधिकवर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरीक आहेत.