नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश
लगाम ते आलापल्ली या नॅशनल हायवेचे काम गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अपूर्ण बांधकाम, खराब रस्ते, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि धुळीमुळे होणाऱ्या समस्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अहेरी येथे भाजपा सदस्यता मोहिमेसाठी आलेल्या माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांना स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या प्रश्नाबाबत आपली व्यथा मांडली. या समस्येची गंभीर दखल घेत मा.खा. नेते यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या कामाचा आढावा घेतला आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
*नागरिकांना होणाऱ्या समस्यांचा आढावा:*
या अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. प्रवासाचा वेळ दुप्पट झाला असून, वाहनचालक, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघात वाढले आहेत, तर धुळीमुळे अनेक नागरिकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम झाला आहे.
*मा.खा.अशोकजी नेते यांची प्रतिक्रिया:*
रस्त्याच्या कामाची पाहणी करताना मा.खा. नेते यांनी सांगितले की, “या प्रकल्पाची वेळेत पूर्तता होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन याला प्राधान्य द्यावे.”
मा. खा.नेते यांनी प्रशासनालाही कामाची प्रगती सातत्याने तपासण्याचे निर्देश दिले. तसेच, अपूर्ण कामामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन केले.
प्रकल्प पूर्ण झाल्यावर लाभ:
हा रस्ता प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास, दळणवळणाच्या सोयींमध्ये सुधारणा होईलच, पण या परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल. स्थानिक व्यापार, उद्योग आणि शिक्षणाच्या संधींना नवी दिशा मिळेल, असे मा.खा. नेते यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता
संबंधित विभाग आणि प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी सोबत जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ आकनपल्लीवार,ता.महामंत्री सुकमल हलदार व अधिकारी वर्ग उपस्थित होते.