महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागाचे वतीने ७० वा नाट्य महोत्सव (प्राथमिक स्पर्धा) चे उद्घाटन संपन्न
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नागपूर विभागाचे वतीने कामगार कल्याण भवन, राजेरघुजीनगर, नागपूर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त मा.श्री. रविराज इळवे यांचे मुख्य मार्गदर्शनाखाली ” ७० वा नाट्य महोत्सव (प्राथमिक स्पर्धा) २०२४-२५ चे आयोजन करण्यांत आलेले आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ नाट्य रंगकर्मी मा.श्री. प्रभाकर दूपारे यांचे शुभहस्ते नुकतेच बुधवार दि.११.१२.२०२४ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी नागपूरचे जेष्ठ साहित्यीक नाट्य दिग्दर्शक व कलावंत डॉ. निलकांत कुलसंगे अध्यक्षस्थानी तथा प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत कामगार संघटना व आसमान फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष मा.डॉ. रवि गि-हे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. नाट्य परिक्षक मा.डॉ. गणेशकुमार वडोदकर, मा.श्री. अभय अंजीकर, मा. सौ. सुनंदा (सुषमा) मोरे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप कल्याण आयुक्त मा. श्री. नंदलाल राठोड यांनी केले. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मनस्वी स्वागत केले. नाट्य स्पर्धा आयोजना मागची मंडळाची भुमिका त्यांनी उपस्थितांसमोर सविस्तर विषद केली. तसेच मंडळ राबवित असलेल्या या अविरत नाट्य स्पर्धा आयोजनात कामगार कलावंतांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मंडळ राबवित असलेल्या कल्याणकारी कार्यक्रमांची तथा आर्थिक लाभार्थी योजनांची माहिती दिली. यावेळी मा. श्री. प्रभाकर दूपारे, मा. श्री. निलकांत कुलसंगे यांनी देखील मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले. म.का.क. मंडळ माजी सदस्य तथा जेष्ठ नाट्य कलावंत श्रीमती शैलताई जेमीनी, श्री. किशोर डाऊ, श्री. राजेंद्र टेकाडे, गुणवंत कामगार श्री. सुरेश रेवतकर यांची देखील उपस्थिती होती. कामगार कल्याण अधिकारी सौ. प्रतिभा भाकरे यांनी आभार मानले. यावेळी कामगार वर्ग, नाट्य रसिक वर्ग परिसरातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मंडळातील समस्त कर्मचारी वर्ग हा नाट्य महोत्सव यशस्वी करण्याकरिता अविरत परिश्रम घेत आहे. कामगार कल्याण केंद्र गडचिरोलीचे वतीने ” द्वंद्व ” हा उद्घाटनाचा नाट्यप्रयोग सायं. ७.०० वा. सादर झाला. दि.११.१२.२०२४ ते दि.७.१.२०२५ या कालावधीत सायं. ७.०० वाजता या स्पर्धाचे आयोजन करण्यांत आले असुन या महोत्सवात एकूण २५ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. सर्व नाट्य प्रयोगांकरिता प्रवेश निःशुल्क असुन समस्त नाट्य रसिक, कामगार बांधव तथा परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहुन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उप कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी यावेळी केले.
